आकाशी झेप घे रे पाखरा.. सोडी सोन्याचा पिंजरा..!

आजही आठवतो तो दिवस..

अमेरिकेला MS करायला जायची पूर्ण तयारी झाली होती. जड मनानं आज्जी-आजोबांचा निरोप घेऊन मी, आई-बाबा आणि माझे काका-काकू गाडीतून पुण्याहून मुंबईला निघालो. गाडीच्या मधल्या सीट्स वर मी आई आणि बाबांच्या मध्ये बसलो होतो. बोलण्यासाठी शब्द नव्हते. मी पूर्ण प्रवासात आईचा हात हातात घेऊन बसलो होतो. मधून मधून तिच्या मांडीवर डोकं ठेऊन शांत झोपायचो. पुणे-मुंबई मधलं ३ तासांचं अंतर जणू कित्येक वर्षांचं वाटत होतं.

शेवटी एकदाचं ते विमानतळ आलं. डोळे पाणावले होते. एकीकडे नवीन जगात जायचा उत्साह, उत्सुकता, तर दुसरीकडे आपली माणसं. माझ्यासारखी कित्येक मुलं आपल्याबरोबर भरमसाठ समान घेऊन आपापल्या लोकांचा निरोप घेत होती. आईच्या डोळ्यातलं पाणी अनावर झालं होतं. काकूचे डोळेहि बरंच काही बोलत होते. बाबा, काका खंबीर चेहऱ्याने उभे होते. अखेरीस निघायची वेळ झाली. काका ने मला कडकडून मिठी मारली. ‘काळजी घे, नीट राहा, तब्येतिला जप’ हे आणि असे भरमसाठ शब्द बोलले आणि ऐकले गेले. विमानतळाच्या दरवाज्यातून आत शिरल्यावर लांबूनच सगळ्यांना टाटा केला. मला वाईट वाटू नये म्हणून कि काय, सगळ्यांनी तात्पुरते चेहरे हसरे केले, पण ते हसू जास्त वेळ टिकलं नाही. डोळ्यातल्या पाण्याचा बांध आता फुटला होता. या वेळी मात्र बाबांच्या डोळ्यात पाणी दिसलं. दरवज्याच्या काचेतून दिसलेले ते चेहरे आजही तसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. इतके दिवस रोज समोर दिसणारे ते चेहरे आता किती दिवस फक्त skype वरच बघायला मिळणार होते ह्याची त्या वेळी कल्पनाच नाही आली.

कित्येक वर्ष होऊन गेली त्या दिवसाला, पण आजही आई-बाबांशी बोलल्याशिवाय एकही दिवस सरत नाही. या काळात इथे एक नवीनच दुनिया बघायला मिळाली. लोक, निसर्ग, सगळं काही नविन. कोणताही नविन अनुभव आला, नविन ठिकाणी गेलो, कि दरवेळी असं वाटलं कि आत्ता आई-बाबा बरोबर असते तर त्याच्या डोळ्यात किती आनंद, अभिमान आणि समाधान बघायला मिळालं असतं.. जे माझे डोळे इथे बघतायत ते जर त्यांना तिथे दिसलं तर किती मस्त होईल!

मी इथे कित्येक Indian Restaurants मध्ये जाऊन आलो, पण आईच्या हातच्या खाण्याची सर कशालाच आली नाही. इथे कितीही सुख-सोयी असुदे, पण आईच्या मांडीवर लागलेली ती शांत, निवांत झोप लागतच नाही. बिन्धास्त पणे बाबांना ‘मला हे घेऊन द्या’,’इकडे फिरायला जाऊया’, असं म्हणायची सोय राहिलेली नाही. कित्येक जिगरी मित्र बनवले, पण आजही भारतातले जुने मित्र दुरावल्याचं वाईट सतत वाटतं. स्वच्छ सुंदर रस्ते, जागा तर नेहमी दिसतात, पण आई-बाबा, मित्रांबरोबर कुठल्याही जागी, मनाला येईल तेव्हा जायची मजा आता हरवून गेलिए. या skype, whatsapp, आणि mobile च्या दुनियेत लोकं कशी भरकन लांब गेली कळलेच नाही.

अजूनही ते रविवार आठवतात, जेव्हा आई-बाबांबरोबर दुपारी छायागीत बघत जेवण होत असे. दिवसभर घरीच बसून काहीही न केलेले कित्येक दिवस फक्त बाबांना सुट्टी असल्यामुळे स्पेशल बनले. माझ्या नोकरीच्या पहिल्या पगारातून आई-बाबांना हॉटेल मध्ये जेवायला घेऊन गेल्यावरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आजही लक्षात आहे.आई-बाबांची किती आठवण येते हे कित्येक वेळा त्यांना बोलून दाखवावं असं वाटतं पण शब्दच अपुरे पडतात. ‘तू इथे परत कधी येतोयस?’ हा जगातला सगळ्यात अवघड प्रश्न बनलेला आहे. माझ्यासारखी असंख्य मुलं परदेशात स्वप्नं घेऊन येतात, आणि मग या VISA, नोकरी च्या कचाट्यात कायमची अडकून बसतात. कित्येकदा विचार येतो आत्ता तिकीट काढून भारतात जाऊन यावं, पण bank-balance कडे बघितल्यावर तो विचार मनातल्या मनातच विरघळतो.

आता कळून चुकलाय कि पैसा, नोकरी हे सगळं जगाच्या पाठीवर कुठेही असेलच, पण आपल्या लोकांशिवाय त्याला कवडीचीही किंमत नाही. आईला हक्काने आवडती dish बनवायला सांगणं आणि तिनेहि ती तितक्याच प्रेमानं खायला घालण्यासारखं सुख दुसरं कुठलंच नाही. मनात येईल तेव्हा मामा-मावश्या, भावा-बहिणींकडे जाऊन मनसोक्त गप्पा मारण्या मधली, रात्र रात्र मित्रांबरोबर शाळा-कॉलेजातले बालिश किस्से ऐकण्या मधली मजा कुठेच नाही. आपल्या शहरात बिनधास्त फिरताना वाटणारं ते आपलेपण कुठेच नाही.

‘सगळं काही इथंच आहे! काहीही झालं तरी इथंच परत यायचं लक्षात ठेव!!’ असं अनेकदा बजावून सांगणारी आज्जी आठवते. ‘मुलं एकदा अमेरिकेत गेली कि कसली येतायत परत?’ असं आईला हसत हसत सांगणारी लोकं आठवतात. असे कित्येक जण बघितलेहि, जे Green Card च्या मागे धावत वर्षानुवर्षं काढतात. इथे येउन सेटल होऊन जातात. पण पैसा, सोयी-सुविधा यांच्यासाठी इतका मोठा त्याग खरच सार्थ आहे? ज्या आई-बाबांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आज आपण जे काहीही आहे ते ज्यांच्या मुळं आहे, त्यांना आपली गरज असताना आपण त्यांच्यापासून वेगळं कसं आणि का राहायचं? अजूनही या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीएत.

इतका सगळा विचार केल्यानंतर आता मात्र एक निश्चय केला आहे. आपल्या लोकांसाठी, आपल्या मित्रांसाठी, आपल्या देशासाठी परत जायचं. जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर. अमेरिका खरच छान असेल, पण मराठमोळ्या मला आपली लोकं, आपला देशच बरा!

| जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी |

Advertisements

2 thoughts on “आकाशी झेप घे रे पाखरा.. सोडी सोन्याचा पिंजरा..!

  1. एकदम हृदयस्पर्शी! आयुष्याला कलाटणी देणारी!! हीच खरी जगायची सुरुवात म्हणता येईल इथे!
    (यालाच उत्तर नव्हता माझ्या मनात !! सगळे प्रश्न सोडवले मी, पण हा !! अगदी माझ्या मनातला विषय! हाच एक खोलातला विषय मला सतावतोय जास्त इथे आल्यापासून !)

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s